साहित्य :
- दिड कप उडीद डाळ
- 2 चमचे खोबर्याचे पातळ काप
- 2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
- 1/2 चमचा जाडसर किसलेले आले
- चवीपुरते मिठ
- तेल
कृती:
- उडीद डाळ धुवून 3 ते 4 तास पाण्यात भिजत घालावी. नंतर त्यातील पाणी काढून टाकावे आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटावे. वाटताना पाणी अजिबात घालू नये. पीठ घट्ट वाटावे.
- मिक्सरमधून वाटण एका खोलगट वाडग्यात काढावे. चमच्याने 3 ते 4 मिनीटे घोटावे. असे जलद गतीने मिश्रण वर खाली करावे. काही मिनिटातच मिश्रण हातालाच हलके झालेले जाणवेल. मिश्रण एकदम घट्ट वाटत असेल तर हात पाण्यात बुडवून मग फेटावे. यामुळे उडीद डाळीचे वाटण हलके होते. नंतर खोबर्याचे काप, हिरव्या मिरच्या, आले आणि चवीपुरते मिठ असे घालून मिक्स करावे. (भिजवलेले पिठ पातळ झाले तर पिठाला दाटपणा येण्यासाठी 2 ते 3 चमचे तांदूळाचे पिठ वापरतात. तांदूळाच्या पिठामुळे वडे वरून कुरकूरीत होतात परंतु आतून किंचीत घट्ट राहतात.)
- वडे तळायला घ्यायच्या आधी एका भांड्यामध्ये पाणी घ्यावे. उडदाचे मिश्रण हाताळताना आधी हात ओला करावा, म्हणजे वड्याला मध्यभागी भोक पाडून तेलात सोडताना पिठ हाताला चिकटणार नाही. हात पाण्यात बुडवून मोठ्या लिंबाएवढा गोळा चार बोटांवर घ्यावा, अंगठ्याने मध्यभागी होल तयार करावे. आणि लगेच तेलात सोडावा. वडा बोटांवरून सरकण्यासाठी अंगठ्याने तळापासून अलगद पुढे ढकलावा. याला थोडा सराव लागतो.
- किंवा मोठ्या वाटीचा तळ भाग ओलसर करून घ्यावा , मोठ्या लिंबाच्या आकाराएवढे पीठ घ्यावे आणि वाटीच्या तळाशी ठेवावे. ओल्या बोटाने त्यामध्ये भोक पाडावे. ते पीठ मध्यम गरम तेलात सोडावे आणि वडे मोकळे होईपर्यंत वाटी पकडावी, वाटी सहजपणे वेगळा करता येतो .
- तळणीसाठी तेल गरम करावे आणि गॅस मिडीयम हायवर ठेवावा. (वडे बारीक आचेवर तळू नयेत त्यामुळे वडे तेलकट होतात.)
वडे सोनेरी किंवा गडद सोनेरी रंगावर तळून घ्यावे. चटणी आणि सांबाराबरोबर गरम गरम सर्व्ह करावे.
0 टिप्पण्या